नाशिक: तपोवन व म्हसरूळ विद्युत उपकेंद्राना आयएसओ मानांकन !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): २०२४ या नवीन वर्षाची सुरुवात महावितरणच्या नाशिक मंडळात असलेल्या तपोवन व म्हसरूळ येथील दोन्ही विद्युत उपकेंद्रांना एकाचवेळी आयएसओ मानांकन प्राप्त करून झाली आहे.

यासाठी येथील अभियंते, यंत्रचालक व सहकाऱ्यांनी कमी कालावधीत संघटितपणे अथक परिश्रम आणि कालबद्ध कृती आराखडा राबून हे यश प्राप्त केले आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडीत सेवा देण्यासाठी कमी कालावधीमध्ये उपकेंद्रामध्ये केलेले भरीव कार्य कौतुकास्पद असून याची इतरांनी प्रेरणा घेऊन या नवीन वर्षात महावितरणच्या नाशिक परिमंडलातील सर्व विद्युत उपकेंद्रे आणि कार्यालये यांना आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्नरत राहण्याचे आवाहन नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.

ते महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ मधील पंचवटी उपविभागाअंतर्गत असणाऱ्या ३३/११ के.व्ही. म्हसरूळ  आणि तपोवन या विद्युत उपकेंद्राला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळाले त्यानिमित्त आयोजित आयएसओ मानांकन कोनशिलाचे अनावरण ३३/११ के.व्ही. तपोवन उपकेंद्र येथे १ जानेवारी रोजी त्यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दिपक कुमठेकर बोलत होते.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंते चेतन वाडे, शैलेश जैन, राजाराम डोंगरे, माणिकलाल तपासे, केशव काळूमाळी व निलेश चालिकवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता चेतन वाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी गतिमानतेने उत्कृष्ट कार्य केले आहे. राज्यातील पहिले  आयएसओ नाशिक परिमंडलातील मुंगसरा विद्युत उपकेंद्र ठरले असून या कार्याचा आदर्श घेऊन निकोप स्पर्धा निर्माण व्हावी आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यात शिस्त लागावी यासाठी आयएसओ मानांकन प्राप्त करून हे व्रताप्रमाणे जपावे, त्यामुळे महावितरणची गतिमान सुधारणा होईल असा विश्वास मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी येथील अभियंते, यंत्रचालक, जनमित्र तथा सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असून त्यामुळे या भागातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित सेवा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे सर्वाना मानकाप्रमाणे कार्य करण्याची सवय निर्माण होणार आहे. हे मानक टिकवणे सुद्धा एक आव्हान असून अशाप्रकारे इतरांनी सुद्धा आयएसओ करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे, त्यांना सर्वतोपरी मदत केल्या जाईल असे प्रतिपादन नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले.

आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून यापुढे विभागातील सर्वच कार्यालये तथा उपकेंद्रे आयएसओ करून ग्राहक सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे आश्वासन नाशिक शहर विभाग १ चे कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी दिले. 

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

दोन्ही विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल पंचवटी उपविभागाचे अभियंते, यंत्रचालक व जनमित्रांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

सोहळ्याला सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व लक्ष्मण वसावे, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंता नंदकिशोर काळे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे आणि अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत, सहाय्यक अभियंता रविंद्र इप्पर व राखी जैन तसेच हेमंत खांबेकर, श्याम निर्भवने, अविनाश अहिरे व दिपक कासव यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचवटी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता चंदन पिंपळे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन यंत्रचालक भूषण सोनवणे सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन तपोवन उपकेंद्राचे यंत्रचालक अविनाश अहिरे यांनी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790