नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उच्चभ्रू वस्तीत घरफोड्या करणारे दोघे उच्चशिक्षित जेरबंद करण्यात आले आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वीही अनेकदा असे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उच्चभ्रू भागात रेकी करत कुलूपबंद बंगले हेरून त्यांच्या खिडक्यांचे भरदिवसा लोखंडी ग्रिल कापून आतमध्ये प्रवेश करीत मास्टर बेडरूमधून मौल्यवान दागिने, वस्तू व रोख रक्कमवर डल्ला मारणाऱ्या इंजिनिअरसह त्याचा पदवीधर साथीदाराच्या अखेर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने वापी, दमण परिसरातून मुसक्या आवळल्या.
त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली चोरीची कार, ३० ग्रॅम सोने व घरफोडीसाठी वापरणारे आधुनिक साहित्य असा सुमारे ७ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गंगापूर रोड परिसरातील शारदानगरमधील शरण बंगल्याच्या किचनच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रिल कापून आतमध्ये प्रवेश करीत चोरांनी रोख रक्कम, सोन्याचे क्वॉइन, महागडे ब्रॅण्डेड घड्याळ, गोदरेजची लोखंडी तिजोरी असा सुमारे २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज गायब केला होता. याप्रकरणी यश हरीश हेमदानी (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गेल्या मंगळवारी (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून केला जात होता, घरफोडी करणाऱ्या संशयितांची ओळख घटनास्थळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पटली होती. तसेच संशयितांनी लंपास केलेल्या महागड्या ईयरबड्समध्ये जीपीएस असल्यामुळे त्यांचे लोकेशन फिर्यादीच्या मोबाइलवर प्राप्त झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांनी तपासाला गती दिली.
दरम्यान, संशयित हे गुजरातच्या वापी परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून ढमाळ यांनी पथकाला सज्ज करून वापी गाठले. संशयित रोहन संजय भोळे (३६, रा. उपनगर), ऋषिकेश ऊर्फ गुड्डू मधुकर काळे (२७, रा. नाशिकरोड) या दोघांना शिताफीने वापीच्या एका हॉटेलमधून पथकाने ताब्यात घेतले आहे, संशयितांना जिल्हा न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि. ६) पोलिस कोठडी सुनावली आहे.
शेअर मार्केटच्या ‘इंट्राडे’चा शौक पडला महगात:
जास्त जोखीम असलेल्या शेअर मार्केटच्या इंट्राडे या एकाच दिवसात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांतून जास्त नफा कमविण्याच्या उद्देशानें संशयित रोहन हा घरफोडीतील सोने-चांदीच्या दागिन्यांची विल्हेवाट लावून ती रकम इंद्राडेमध्ये गुंतवणूक करायचा, असे प्रथमदर्शनी तपासातून उघडकीस आले आहे.
रोहन हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याने हाताशी धरलेला ऋषिकेश हा पदवीधर आहे. घरफोड्यांचा मास्टर- माइंड रोहन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऑनलाइन मागविली आधुनिक साधनसामग्री:
ग्राइंडर मशिन, 3 उच्च प्रतीची गॅस गन, आधुनिक हायड्रोलिक कटर, लोखंडी कटावणी असे साहित्य संशयित रोहन हा एका बॅगेमध्ये घेऊन रेकी करीत असे. हे साहित्य त्याने ऑनलाइन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. रेकी करताना जे बंद बंगले एकाकी आहेत, त्यांची तो निवड करायचा. बंगल्याजवळ जाऊन पाहणी करताना जर कोणी आजूबाजूला दिसले तर त्यांना ‘शेठ आहे का…?’ असा प्रश्न विचारून निघून जात होता. दरवाजाचा कडीकोयंडा न तोडता पाठीमागील बाजूच्या खिडक्यांमूधनच हा रोहन घरफोडी करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
सराईत गुन्हेगार; घरफोडीचे चार गुन्हे उघड:
गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर जी ओझर येथे घरफोडी करून पळविली होती, ती देखील जप्त करून त्या दोघांना नाशिकला आणले.
हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांची कसून चौकशी केली असता, गंगापूर परिसरातील दोन व ओझर, सिन्नर येथील एक असे एकूण घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वीही अनेकदा असे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे ढमाळ यांनी सांगितले.