नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): चिटफंड प्रकरणाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, शहर-जिल्ह्यातील सुमारे चारशे जणांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाथर्डी फाटा परिसरातील बालाजी फायनान्सशिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गरिबांचे भले करण्यासाठी दोन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. या कर्जावर सबसिडीही मिळत असल्याने या आमिषाला भुलून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बालाजी फायनान्सशिअल सर्व्हिसेस प्रा.लि. व एस. के. फायनान्सशिअल सर्व्हिसेस ॲण्ड मॅन पॉवर कन्सल्टन्सी ॲण्ड सर्व्हिसेसच्या संचालकांसह प्रतिनिधी, एजंट अशा सुमारे २० जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा इंदिरानगर पोलिसात दाखल केला आहे.
नरेश महेश शेर (रा. दूर्गानगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, या कंपन्यांचे संचालक कृष्णाराव रेड्डी, माधवन् कृष्णन्, श्रीनिवासन्, यांच्यासह १७ जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेर यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना त्यांच्या काळ्यापिवळ्या टॅक्सीवरील कर्ज फेडायचे होते. बालाजी फायनान्सशिअलकडून बिनव्याजी २ लाखांचे कर्जाची माहिती मिळाली असता ते गेल्या १३ डिसेंबर रोजी पाथर्डी फाटा परिसरातील के. के. प्लाझामध्ये असलेल्या बालाजी फायनान्सच्या कार्यालयात गेले.
त्यावेळी कंपनीच्या एजंट्सनी कर्जाची माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला. २ लाखांच्या कर्जावर त्यांना १ लाख ४० हजारांचीच परतफेड करावी लागणार होती.
त्यासाठी त्यांना ३ हजार ८९० रुपयांचा मासिक हप्ता द्यावयाचा होता. त्यासाठी त्यांच्याकडून विविध प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली ९ हजार ६६० रुपये दिले. दोन दिवसांनंतर कर्ज मंजूर न झाल्याने विचारणा केली असता, त्यांना सीबीएस चौकातील एका महिला वकीलाकडे पाठवून शंभर रुपयांच्या मुद्रांकावर सह्या, अंगठ्याचे ठसे घेतले.
त्यानंतरही त्यांना जामीनदार आणण्यास सांगितले. असे या ना त्या कारणांनी त्यांनी कर्जाचा धनादेश घेण्यासाठी चकरा मारल्या.
मात्र, गेल्या ३० डिसेंबर रोजी ते गेले असता, त्यावेळी इतरही लोक त्याठिकाणी कर्जाचे धनादेश घेण्यासाठी आलेले होते.
त्यावेळी संशयितांनी अनेकांची कर्जाच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले. त्याबाबत विचारणा केली असता संबंधितांनी धमकावणे सुरू केले. तसेच, उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांची १२ हजार ९६० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेर यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी आहे मोडस ऑपरेंडी:
बालाजी फायनान्स कार्यालयात आलेल्या व्यक्तीला बालाजी फायनान्स ही गरिबांसाठीची बिनव्याजी कर्ज देणारी कंपनी असल्याचे भासविले जाते. तसेच २ लाखांच्या बिनव्याजी कर्जावर ६० हजारांची सबसिडी मिळत असल्याचे आमिष दाखवून समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन केला जातो.
त्यानंतर संबंधिताचे आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, शंभरांच्या मुद्रांकावर करारनामा केला जातो. या प्रक्रियेसाठी विविधप्रकारे पैसे उकळले जातात. त्यानंतर दोन दिवसात धनादेश मिळेल असे सांगत या ना त्या कारणांने संबंधिताला चकरा मारण्यास भाग पाडले जाते.
अशारितीने १२ ते १५ हजार रुपयांपर्यंतची फसवणूक केली जाते. त्यानुसार शहर-जिल्ह्यातील शेकडो जणांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीक कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पिसे हे करीत आहेत.