नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शिवाजीनगर आगारातून सुटणाऱ्या काही ई-शिवाई बस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्वारगेट येथून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे.
पुण्यातून शिवाजीनगर आगारातून नाशिकसाठी १६ ई-शिवाई बस १५ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली होती. दर एक तासाला शिवाजीनगर येथून ई-शिवाई बस सुरू होती. पण, स्वारगेट येथून नाशिकला ई-शिवाई बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.
त्यामुळे पुणे एसटी विभागाने पहाटे पाच ते दुपारी एक दरम्यान शिवाजीनगर येथून सुटणाऱ्या ई-शिवाई बस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरूवात केली आहे.
त्या बस स्वारगेट येथून सुटल्यानंतर शिवाजीनगर आगार येथून प्रवाशांना घेऊन जातील. त्यामुळे दोन्ही आगारातील नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहाटे पाच ते दुपारी एक दरम्यान एका तासाला स्वारगेट येथून बस सुटणार आहेत.
पुणे विभागातून चार शहरांसाठी ई-शिवाई बस सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे ई-शिवाईची सेवा सुरू आहे. पुणे विभागातून साधारण २० ई-शिवाई सोडल्या जात आहेत. तर, त्या चार शहरातून पुण्यासाठी २० ई-शिवाई येतात. तसेच, स्वारगेट व पुणे स्टेशन येथून मुंबईसाठी ६६ ई-शिवनेरी धावत आहेत.
![]()


