नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे शिवशाही बसने एका तरुणाला चिरडल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर येथील बस स्थानकासमोरून पायी जाणाऱ्या तरुणाला बस स्थानकातून भरधाव वेगात बाहेर पडणाऱ्या शिवशाही बसने चिरडल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. बसचे चाक तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
विजय तुकाराम मोरे (वय 42, रा. सातपीर गल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे. विजय हे सकाळी 10 वाजेच्या दरम्यान आपल्या मुलाला शाळेत सोडवून कामानिमित्त बस स्थानक परिसरात आले होते. बस स्थानकासमोरून ते पायी जात असताना पालघर डेपोची शिवशाही बस क्रमांक एम. एच. 09 इ. एम. 9587 ही बस स्थानकातून भरधाव वेगात बाहेर पडत होती.
बस चालकाने पायी चालणाऱ्या विजय यांना धडक देऊन थेट त्यांच्या अंगावरून बस पुढे नेली. विजय हे बसच्या चाकाखाली सापडल्याने ते जबर जखमी झाले. डोक्यावरून चाक गेल्याने सुरुवातीला त्यांची ओळख ही पटत नव्हती. स्थानिकांनी मदत करत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे विजय यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सिन्नर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत अपघाताची पाहणी केली. याप्रकरणी अधिक चौकशीसाठी बस चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790