नाशिक: ऑक्सिजन सिलिंडर स्फोट प्रकरणी चालक-मालकावर गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणारा भरधाव टेम्पो शनिवारी (दि. १०) गंगापूर रोडवरील शांतीनिकेतन चौकातील तिरोधकावर जोरदारपणे आदळला.

यावेळी टेम्पोमध्ये असलेल्या तीनपैकी एका सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी टेम्पोचालक व सिलिंडर पुरविणाऱ्या कंपनीच्या संचालकाविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालयांना व्यावसायिक दृष्टिकोनातून ऑक्सिजन सिलिंडर पुरविणाऱ्या भारत कमर्शिअल सेंटर कंपनीकडे कामाला असलेला टेम्पोचालक मंगेश डुमसे (रा. मंगलवाडी) हा नेहमीप्रमाणे गंगापूर रोड भागातील एका रुग्णालयात सिलिंडर देण्यासाठी टेम्पो (एमएच १५ डीके ५१८४) घेऊन जात होता. टेम्पोचा वेग जास्त असल्याने अचानकपणे दिसलेल्या गतिरोधक ओलांडताना त्याने जोराने ब्रेक लावला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

यामुळे टेम्पो गतिरोधकावर आदळला अन् त्यामध्ये असलेले सिलिंडर हे एकमेकांवर आदळून एक सिलिंडर फुटले होते. यामुळे या टेम्पोमागे असलेल्या दोन वाहनांचे व आजूबाजूच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. या स्फोटात टेम्पोचालक ढुमसे, क्लीनर विजय जगताप, हेल्पर मनोज गारे हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर आनंदवली येथील श्री गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करताना चालक व मालकाने आवश्यक ती पुरेशी सुरक्षेची काळजी न घेता असुरक्षितपणे वाहतूक करत नागरिकांच्या जीविताला धोका होईल, अशा प्रकारचा निष्काळजीपणा केल्याचा ठपका पोलिसांनी फिर्यादीत ठेवला आहे. वाहनाचा वेग व अचानकपणे चालकाने लावलेला ब्रेक आणि गतिरोधकावरील आदळआपटमुळे तीनही सिलिंडरच्या टाक्या एकमेकांवर आदळून घर्षण होऊन स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून रविवारी (दि. १०) वर्तविण्यात आला आहे. पोलिस नाईक कमलाकर मोरे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here