नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकीकडे केंद्र शासनाच्या निधीतून बांधकाम विभागाने २० कोटी खर्चून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

असे असतानाच रस्त्याच्या मधोमध व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या दत्त मंदिर चौकापर्यंतची २४ झाडे नवीन १२० झाडे लावण्याच्या बदल्यात तोडण्यास पालिकेच्या उद्यान विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे नाशिक-पुणे रस्ता मोकळा श्वास घेणार असून २४ पैकी ९ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठे रिंगरोड झाले. तसेच प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरणही झाले. हे रस्ते ३० मीटरपर्यंत रुंद केले गेले मात्र पूर्वीचे रस्ते चिंचोळे असल्यामुळे त्याकडेला असलेले वड, पिंपळ व अन्य पुरातन वृक्षांना हटवता आले नाही. हे वृक्ष तोडण्यासाठी महापालिका किंवा केंद्रीय, राज्य महामार्ग प्राधिकरणाने प्रयत्न केल्यानंतर त्यास वृक्षप्रेमींनी हरकत घेतली. त्यावर बराच खल झाल्यानंतरही तोडगा निघाला नाही.
वृक्षांचे जतन होणे महत्वाचे:
रस्त्यांमधील धोकेदायक वृक्षांमुळे होणारे अपघात लक्षात घेता २४ झाडांच्या तोडण्यास मान्यता दिली मात्र झाडे तोडण्याबरोबरच पुनर्रोपण व जतन महत्वाचे आहे. त्यामुळे ९ झाडांचे पुनर्रोपण व १२० नवीन झाडे लावण्याची अट घातली आहे. – विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक
पुनर्रोपणावर पालिका ठाम; NHAI ची मागणी फेटाळली:
महापालिकेने २४ झाडांपैकी ९ पुरातन झाडांचे पुनर्रोपण करण्याची अट घातली आहे. ही अट वगळण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थातच NHAIने केले होती. मात्र पालिकेने हे मागणी फेटाळली असून २४ झाडे तोडायची असेल तर त्यातील ९ झाडांचे पुनर्रोपण करावे अशी अट कायम ठेवली आहे. या ९ पुनर्रोपण होणाऱ्या झाडांमध्ये ८ वड तर १ मोहाचे झाड आहे. तोडल्या जाणाऱ्या झाडांमध्ये ९ कडूनिंब, १ सिसम, १ करंज, ३ अंबट चिंच तर १ विलायती चिंचाचे आहे.
..तर वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार:
नाशिक-पुणेरोडवर प्रामुख्याने द्वारका, बिटको चौक तसेच जयभवानीरोडकडे जाण्यासाठी नाशिकवरून जाताना उजव्या हाताने वळण घेतल्यानंतर या ठिकाणी वाहतुक कोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी मध्यंतरी, केंद्र शासनाने या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित केला. त्यासाठी मान्यताही मिळाली. त्यानंतर निओ मेट्रोमुळे डबलडेकर उड्डाणपुलाचा प्रस्ताव पुढे आला. मात्र तेही थंड बस्त्यात आहे. हे काम होत नसल्यामुळे रस्ते कामासाठी २० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून दुरूस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थीतीत आता २४ झाडे तोडल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790