नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बोगस शिक्षक भरतीसह नोकरीचे आमिष दाखवून नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये चार गुन्हे दाखल असलेल्या हिरे कुटूंबियांविरोधात पाचवा गुन्हा भद्रकाली पोलिसात दाखल झाला आहे.
हिरे यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून निती आयोगाकडील १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, नाशिकरोड पोलिसात दाखल शिक्षण बोगस भरती प्रकरणी गुन्ह्यात संस्थेचे संचालक व सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले डॉ. अद्वय हिरे यांच्यासह तिघांना नाशिकरोड न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठलराव देवरे (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थेचे पदाधिकारी अद्वय प्रशांत हिरे, डॉ. अपुर्व प्रशांत हिरे यांच्यासह संचालक मंडळांसह १० शाळांच्या तत्कालिन मुख्याध्यापकांविरोधात शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या संशयित संचालकांनी संस्थेअंतर्गत असलेल्या दहा शाळांनी अटल टिंकरींग लॅब स्थापन करण्यासाठी अर्ज केला.
त्यासाठी असलेल्या नियमांची पुर्तता करण्यासाठी बनावट व चुकीची कागदपत्रे दिली. त्यानुसार, निती आयोगाकडून संबंधित शाळांना १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला.
दरम्यान, या शाळांची चौकशी केली असता, प्रत्यक्षात या शाळांमध्ये संबंधित लॅबच नसल्याचा गैरप्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात हिरे बंधुसह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व शाळांचे तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
एटीएल लॅब योजना:
केंद्राच्या अटल इनोवेशन मिशन उपक्रमांतंर्गत विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन वाढावा यासाठी निती आयोगामार्फत शासनाच्या अटी शर्थी पुर्ण करणाऱ्या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटीएल लॅब) स्थापन केल्या आहेत. यासाठी शाळेत किमान १५०० हजार चौरस फुट बांधकाम व किमान दीड हजार विद्यार्थी असणे आवश्यक होते.
या नियमांची पुर्तता केल्यास संबंधित शाळांना निती आयोगाकडून भांडवली खर्चासाठी १० लाख रुपये व देखभाल दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये अनुदान दिले जाते. हिरे यांच्या संस्थांनी सदरचे अनुदान लाटले आहे.
एका गुन्ह्यात दिलासा:
गेल्या ऑक्टोबर महिन्यात नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये बोगस शिक्षक भरतीप्रकरणी अद्वय हिरे, रामचंद्र जाधव, प्राजक्ता ठाकूर यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तिघांच्या अटकपूर्व जामीनावर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.
यात अतिरिक्त सत्र न्या. आर.आर. राठी यांनी अद्वय हिरे, रामचंद्र जाधव, प्राजक्ता ठाकूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात ॲड. एम. वाय. काळे, ॲड. अच्युत निकम यांनी कामकाज पाहिले.
भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता संस्थेच्या ज्या- ज्या शाखांमध्ये अटल लॅबसाठी अनुदान प्राप्त झाले आहे, त्याठिकाणी लॅब अस्तित्वात असून, योग्य प्रकारे सुरू आहेत. यात कुठलाही घोटाळा झालेला नाही. सरकारच्या नीती आयोगाकडूनही कुठलीही तक्रार आलेली नाही. सदरचे आरोप व गुन्हे हे फक्त राजकीय आकस ठेवतच नोंदविले गेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सदरचे अनुदान हे केंद्र सरकारकडून येत असल्याकारणाने यात गुन्हा नोंदविण्याचा अधिकार राज्य शासनाला किंवा शिक्षण विभागाला नसल्याने अवैधरीत्या हा गुन्हा नोंदविला गेला आहे. याच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. – डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, समन्वयक, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती
![]()


