नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोदावरी खोऱ्यातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडताना प्रथम गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांच्या आदेशाची फेरनियोजनानंतर अंमलबजावणी करावी. त्यातून गंगापूर धरण वगळावे, हवे तर दारणातून ०.५ टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्याकडे केली.
यंदा दुष्काळी स्थितीत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालकांनी गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या सद्यस्थितीचा विचार केला नाही. कारण धरणातील पाणी हे ७० टक्के पिण्यासाठी आरक्षित आहे. उर्वरित पाणी हे द्राक्षबागांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देण्यात येते.
गंगापूर धरणातून पाणी मराठवाड्यासाठी सोडल्यास द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होईल. गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास मराठवाड्याचा फायदा होणार नाहीच परंतु नाशिक जिल्ह्याचे मात्र कधीही भरून न येणारे नुकसान होईल. दारणा धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी उचलता येत नाही. त्यामुळे ०.५ टीएमसी हे अतिरिक्त पाणी दारणा धरणातून सोडल्यास मोठं नुकसान टळेल, असेही फरांदे यांनी निवेदनातून उपाय सुचवला आहे.
धरण परिसरात जमावबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:
मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालकांनी दिल्यानंतर पाणी सोडले जात नसल्याने गंगापूरसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर मराठवाडावासीयांनी आंदोलने करण्यास सुरुवात केली. यामुळे धरण परिसराची सुरक्षितता तसेच आंदोलकांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी गंगपूर धरण परिसरात कलम १४४ अर्थात जमाव बंदी आदेश लागू केले आहेत.