नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
पुणे (प्रतिनिधी): ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.
1 ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता, तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक कालेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त, चौकशीचे आदेश जारी:
ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मॅटचा निकाल विरोधात गेल्याने डॉक्टर संजीव ठाकूर पदमुक्त होणार हे स्पष्ट झालेल असताना त्यांना पुन्हा पदमुक्त करण्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश म्हणजे धुळफेक असल्याच विरोधकांनी म्हटले आहे. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.
ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवलय.
या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते.
डॉक्टर संजीव ठाकूर ससून रुग्णालयाचे डीन दहा महिन्यांपूर्वी रुजू झाले. ललित पाटील ससून रुग्णालयात डिसेंबर 2020 पासून ठाण मांडून होता. त्यामुळे डॉक्टर ठाकूर यांच्या आधीच डीन आणि अधिकार्यांची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरची ही कारवाई म्हणजे धूळफेक असल्याच आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
ससूनच्या डीन पदी डॉक्टर ठाकूर यांची नियुक्ती करण्यासाठी ससुनचे आधीचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची मुदती आधी बदली करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टर काळे यांनी मॅटमधे दाद मागितली होती. मॅटने शुक्रवारी डॉक्टर विनायक काळे यांच्या बाजूने निकाल देताना डॉक्टर संजीव ठाकूर यांना तात्काळ पदमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉक्टर ठाकूर यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले.