नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नगर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तब्बल १ कोटींची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते.
या घटनेतील फरार असलेला सहआरोपी व सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धुळे येथे कार्यकारी अभियंतापदावर कार्यरत गणेश लक्ष्मण वाघ यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. एसीबीच्या नाशिक पथकाने काल (ता.१४) अटक केली असून, न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर उपविभागातील सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड यास ३ नोव्हेंबरला १ कोटी रुपये लाचेची रक्कम स्विकारताना पकडण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध नगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कारवाईतील सहआरोपी व सध्या औद्योगिक विकास महामंडळ, धुळे येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत गणेश लक्ष्मण वाघ हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. नाशिक विभागाचे पथक सातत्याने शोध घेत असताना काल (ता.१४) नाशिक पथकाचे पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
यानंतर नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौकशीसाठी रविवार (ता.१९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलिस नाईक किरण धुळे, संदीप हांडगे यांनी केली.