नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या द्वारका भागात गुंतवणुकीच्या बहाण्याने २१ लाखास गंडा घातल्या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. याप्रकरणी आकाश विनायक सोनवणे (रा.धात्रक फाटा,आडगाव शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे.
सोनवणे यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांना संशयित भास्कर कोंडाजी बिन्नर (चेअरमन), विष्णू दिनकर, रामचंद्र भोये, अरूण मालूसरे, सुधाकर लोंढे व दिपक निकम आदींनी ठेवींवर जास्त व्याजदराचे आमिष दाखवून त्यांच्या पौर्णिमा स्टॉप जवळील जीत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्रमसंपदा निधी लिमीटेड या संस्थेत पैसे गुंतविण्यास भाग पाडले.
२५ मार्च ते ८ नोव्हेंबर दरम्यान सोनवणे यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांनी सुमारे २० लाख ७८ हजार ३०० रूपयांची गुंतवणुक केली मात्र काही दिवसांपूर्वी संशयितांनी ठेवी अथवा पूर्वसुचना न देता आपले कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७७/२०२३) अधिक तपास निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.