नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील भेसळयुक्त पदार्थावर कारवाईचा बडगा उगारला असून त्याचाच एक भाग म्हणून पथके नेमत धडक कारवाईद्वारे लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. नागरीकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी धाड सत्र सुरु केले आहे.
या मोहीमेत मधुर फुड प्लाझा, नाशिक येथे छापा टाकून विक्रीसाठी प्लॉस्टिक डब्यांमध्ये साठविलेल्या अन्नपदार्थांच्या पॅकिंगची तपासणी केली असता त्याच्या लेबलवर बॅच नंबर, उत्पादन तारीख तसेच एक्सापयरी डेट व कुठे व कुणी उत्पादन केले याबाबतचा संपूर्ण पत्ता नमुद न केल्याचे आढळल्याने त्या साठ्यातून नमुना घेऊन उर्वरित शिल्लक साठा ६१.५ किलो हा लेबलदोषयुक्त असल्याने व अप्रमाणित असल्याच्या संशयावरुन १८ हजार ४५० रुपये किंमतीचा साठा अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी जप्त केला.
तसेच सिन्नरमधील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील इगल कॉर्पोरेशन येथे धाड टाकून तपासणी केली असता खुले खाद्यतेल तसेच पुर्नवापर केलेल्या डब्यांमध्ये खाद्यपदार्थाची विक्री केल्याच्या संशयासोबतच भेसळीच्या संशयावरुन रेफाईण्ड सोयाबीन तेल (खुले) ५३ प्लॉस्टिक कॅन (अंदाजे किंमत रु.९३,३३५), रिफाईण्ड सोयाबीन पुर्नवापर केलेले डबे एकुण ६१३.४ किलो (अंदाजे किंमत रु.६२,५६६), रिफाईण्ड पामोलिन तेल केलेले २८ डबे एकूण ४१८.४ किलो (अंदाजे किंमत रु.३७,५५६) असा एकूण १ लाख ९३ हजार ५५८ रुपयांचा साठा अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी जप्त केला. या दोन्ही ठिकाणच्या कारवायांमध्ये एकूण २ लाख १२ हजारांचे खादयतेल जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, सदरची कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त सं.भा.नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, उदयदत्त लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. पाटील, सुवर्णा महाजन व अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) यांनी केली आहे.