नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जायकवाडीसाठी नाशिकमधील दारणा धरणसमूहातून २.६४ तर गंगापूर धरणसमूहातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयामुळे नाशिक महापालिकेची चिंता वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे, गंगापूर धरणसमूहावर फारशी टाच येणार नसली तरी, दारणा धरण समुहातील मुकणेमधून पाणी सोडावे लागणार आहे. याच मुकणेतून १६०० दशलक्ष घनफूट पाणी मागणी महापालिकेने नोंदवली असून मुकणेतून पाणी सोडले तर, नाशिक महापालिकेच्या पाणी मागणीत दहा टक्के कपातीची भीती आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधीकरण तसेच समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार यंदा जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडावे लागणार आहे. जायकवाडीत सध्या ४५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळेमेंढिगिरी समितीच्या समन्यायी पाणी वाटपाच्या अहवालानुसार नाशिक व नगरमधील धरणांतून जायकवाडीसाठी ८.६० टीएमसी पाणी सोडावे लागेल. तसे आदेशही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले असून नाशिक व नगरमधून पाणी कसे सोडावे यासाठी नियोजन सुरू केले. नाशिकचा विचार केला तर, जून ते सप्टेंबर या कालावधीत धरणातील पाण्यावर कोणाचाही हक्क नसतो. १५ ऑक्टोंबर ते ३१ जुलै असे पाणी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोंदणी केली जाते.
दरम्यान, ऑक्टोंबर ते जून महिन्यासाठी महापालिकेसाठी गंगापूर, मुकणे व दारणा धरणांतून ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागणी केली आहे. त्यात, गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणेतून १६०० तर दारणातून १०० अशाप्रकारे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी अपेक्षित आहे. त्यात गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे तसेच गाळयुक्त पाणी असल्यामुळे दारणा धरणातून पाणी अधिकाधिक सोडावे लागण्याची रणनीती आहे. तसे झाले तर, दारणातून महापालिकेला केवळ १०० दशलक्ष घनफुट पाणी अपेक्षित आहे मात्र याच समूहात असलेल्या मुकणेतून १६०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार असल्यामुळे कपातीचा फटका या ठिकाणी बसू शकतो.
..या भागात होऊ शकते अडचण:
सद्यस्थितीत पाथर्डी फाटा, सिडको, सातपूर व नाशिकरोडच्या काही भागात मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणी अडचण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.