नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू असून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी भरवस येथील तरुण आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि या तरुणाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे.
मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत असून ठिकठिकाणी रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. धुळे-सोलापूर मार्गावर देखील रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये देखील या आंदोलनाचे पडसाद उमटत असून निफाड तालुक्यातील भरवस फाट्यावर मराठा समाजाने एकत्रित रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी तासभर वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच यावेळी महिला भगिनींनी आपल्या भाषणातून सरकारवर ताशेरे ओढले असून आमच्या मुलाबाळांसाठी शासनाने लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील निफाडकडे जाणाऱ्या भरवस फाट्यावर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आला असून यात महिला भगिनींसह लहान मुलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्र येत मराठा सकल बांधवांकडून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
या रास्ता रोको आंदोलनासाठी दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूक थांबले असून गेल्या तासाभरापासून हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात येत असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा पुढचा आंदोलन महागात पडेल असा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात आला आहे.