नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात अमली पदार्थांची दुकानदारी मोडून काढण्यासाठी आता पोलिस आणि अन्न औषध प्रशासन एकत्र येऊन कारवाई करणार आहे. सीसीटीव्ही लावण्यापासून तर मुलांवरील होणारा परिणाम तपासतील.
जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी समितीची बैठक शुक्रवारी (ता. २७) निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत जिल्ह्यात अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी फॅक्ट्री इन्स्पेक्टर (कामगार विभाग) व पोलिस प्रशासन, एमआयडीसी व डीआयसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तिकपणे जिल्ह्यात बंद पडलेल्या कारखान्यांची सखोल तपासणी करावी, असे ठरले. दोन्ही विभागांनी जिल्ह्यातील सर्व रासायनिक कारखाने आणि औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची तपासणी करावी.
अन्न-औषध प्रशासन विभागाने शेड्युल ड्रग X, H, H9 व Inhaler विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर तसेच आवक-जावक यावर लक्ष ठेवावे आणि संबंधितांना सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ बसविण्याबाबत सूचित करावे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवावी व अवैध वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराबाहेर संशयास्पद ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवश्यक उपाययोजना करणे, पोलिसांनी महाविद्यालयांजवळील दुकाने/ पानटपरी यांची नियमित तपासणी करावी, असे ठरले. आरोग्य विभागाने व्यसनमुक्ती केंद्राच्या व अशा खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या माध्यमातून किती रुग्णांवर उपचार होतात, कुठल्या पदार्थांचे व्यसन जडले, त्यांना अमली पदार्थांची उपलब्धता कोणत्या मार्गाने झाली आहे, याबाबत सर्व माहिती संकलित करण्याचे ठरले.
गांजा शेती तपासणार:
कृषी व वन विभागाने जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, या अनुषंगाने आवश्यक त्या तपासण्या करण्यात याव्यात, अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या.