नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात रविवार (ता.१५) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे.
मंदिर प्रशासनाकडून नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सव काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जय्यत तयारी केली असून, तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली.
अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर यात्रोत्सव काळात देवदर्शनसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पन्नासहून सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात जागोजागी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
तसेच महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यात्रोत्सव काळात पोलिस मदत केंद्र, गडकरी चौक ते संदीप हॉटेलपर्यंत भाविकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना देण्याची व्यवस्था केली आहे नवरात्रोत्सव काळात पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे.
पहिल्या माळेला पहाटे तीन वाजता काकड आरती करण्यात येणार असून, पहाटे ५ वाजता विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना आणि घटपूजन करण्यात येणार आहे.
तर या वर्षी पहिल्या माळेच्या सकाळी ७ वाजता होणाऱ्या आरतीचा आणि महापूजेचा मान विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे यांना मिळाला आहे, तसेच महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते आठ वाजता महाआरती करण्यात येणार आहे.
त्यानंतर दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील देवी भाविकांच्या आग्रहास्तव यंदा प्रथमच कोजागरी पौर्णिमेपर्यत यात्रोत्सव सुरू राहणार आहे.
या वेळी सर्वच भाविकांना दर्शन घेणे सुखकर होणार आहे. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून येणारे तसेच बाहेरगावी जाणारे भाविकांना तत्काळ देवी दर्शन घेण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून स्वतंत्र देणगी दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे आता भाविकांना देणगी दर्शन रांगेतून तत्काळ दर्शनही घेता येणार आहे. यात्रोत्सवात भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे आवाहन अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजीया, विश्वस्त किशोर कोठावळे, आबा पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार आदींसह कालिका देवी भक्त मंडळांनी केले आहे