नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात ऑक्टोबर हिटमुळे विजेची मागणी सुमारे २८ हजार मेगावॉट पर्यंत पोहचली असल्याने विजेची निर्मिती आणि मागणी यांचा ताळमेळ बसविण्यासाठी बाह्य स्त्रोतांकडून वीज खरेदी करावी लागत आहे. वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने ही विजेचे उत्पादन देखील वाढविले आहे.
राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच काही ठिकाणी अचानक उद्भवलेल्या तांत्रिक दोष, देखभाल दुरुस्ती, बॉयलर ट्यूब लिकेज, कोळशाची समस्या वगळता राज्यातील सर्वच औष्णिक वीजकेंद्रातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरु असल्याचे समजते.
घरगुती, कृषिपंपासह औद्योगिक विजेचा वापर वाढल्याने गुरुवारी (दि. १२) दुपारी विजेची मागणी २८ हजार मेगावॅट पर्यंत गेली आहे.
पावसाळ्यात राज्यातील तापमान कमी होत असल्याने विजेची मागणी साधारणपणे २० ते २२ हजार मेगावॅट दरम्यान असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने ही मागणी कमी झाली होती. परंतु उकाडा वाढत असल्याने सर्वत्र वातानुकूलित यंत्रे, पंखे, विजेची उपकरणे, कृषिपंपाचा वापर व औद्योगिक क्षेत्रातील विजेची मागणी वाढल्याने गुरुवारी दुपारी ३ वाजेदरम्यान विजेची मागणी २८ हजार ४७८ मेगावॅट नोंदवली गेली.
राज्यात मागणीच्या तुलनेत १८ हजार २६६ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. महानिर्मितीच्या औष्णिक, गॅस, हायड्रो, सोलर मिळून सर्वाधिक ८६७८ मेगावॅट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून केली जात असल्याची माहिती मिळते. विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत १०३१२ मेगावॅट होती.
मात्र हा तुटवडा केंद्राच्या अखत्यारीतून भरुन काढला जात असल्याने ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होत असल्याने महावितरणकडून करण्यात आला. दरम्यान खासगी क्षेत्रातील प्रकल्पांपैकी जिंदाल, अदानी, आयडियल, रतन इंडिया, एसडब्ल्यूपीजीएल व इतरांची मिळून ८१५३ मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती.