नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ‘एन-कॅप’ योजनेंतर्गत नाशिक महापालिकेने पन्नास बस खरेदी करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता केंद्र शासनाच्या पीएम ई- बस योजनेच्या माध्यमातून शंभर इलेक्ट्रिक बसचे नियोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महापालिकेला ‘ग्रॉस टू कास्ट’ तत्त्वावर बस चालविता येणार आहे.
महापालिकेकडून एसटी महामंडळाकडून बससेवा ताब्यात घेऊन ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. दोनशे सीएनजी, पन्नास डिझेल बस आतापर्यंत रस्त्यावर धावत आहे. महापालिकेने एन-कॅप योजनेंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तत्काळ बस उपलब्ध होवू शकतं नसल्याने सदर निधी रस्ते विकासाच्या कामांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारकडून बस:
केंद्र सरकारने राज्यातील २३ महापालिकांना इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही प्रतिकिलोमीटर मागे बावीस रुपये अनुदान दिले जाणार आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, डेपो व अन्य व्यवस्थापनाचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने यासंदर्भात सर्वेक्षण केले. बस डेपो जागा, बस डेपो क्षमता, चार्जिंग स्टेशन, विजेची उपलब्धता आदी बाबी तपासण्यात आल्या. महापालिकेचे नोडल अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे.
“केंद्र सरकारच्या पीएम बस योजनेतून शंभर इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार आहे. बसचे व्यवस्थापन, डेपो, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची तयारी यासंदर्भात सल्लागार संस्थेच्या माध्यमातून अहवाल सादर केला जाणार आहे.” – बाजीराव माळी कार्यकारी अभियंता, यांत्रिक विभाग.