नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): निफाड येथील बोकडदरे शिवारात अंकुश वसंतराव कातकाडे यांच्या घरी नाशिक अन्न व औषध प्रशासन, नाशिक ग्रामीण पोलिस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत भेसळयुक्त दुधाचा ४८ हजार १६४ रुपयांचा साठा जप्त केला.
भेसळयुक्त पदार्थांपैकी हेमंत पवार (शहा, पंचाळे, ता. सिन्नर) यांनी दूध पावडरचा व सिन्नर, माळेगाव येथील मोहन आरोटे यांनी तेलसदृश पदार्थाचा पुरवठा केला असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे सदर विक्रेते व पुरवठादार यांच्यावर अन्नसुरक्षा मानके कायद्यान्वये तपासासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत डेअरी परमिट पावडर १६ किलो (किंमत २,२४० रुपये), व्होल मिल्क पावडर ३२ किलो (किंमत ७,६८० रुपये), तेलसदृश पदार्थ १६८ लिटर (किंमत २५,७०४ रुपये) व भेसळयुक्त गाय दूध ४१८ लिटर (किंमत १२ हजार ५४० रुपये) असा एकूण ४८ हजार १६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त गाय दूध हे भेसळयुक्त व नाशवंत असल्याने मानवी सेवनास येऊ नये, या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आले.
कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासानाने माहिती देताना सांगितले, की गोपनीय माहिती मिळाल्यावर अंकुश कातकाडे यांचे राहते घर, कातकाडे मळा, गट क्रमांक ३१/१/ब/२, बोकडदरे शिवार, ता. निफाड, जि. नाशिक येथे तपासणी केली असता सदर ठिकाणी एक व्यक्ती दुधाच्या प्लास्टिक कॅनमध्ये काही पदार्थ मिसळवत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पंचांसमक्ष सदर परिसराची झाडाझडती घेतली असता सदर ठिकाणी डेअरी परमिट पावडर १६ किलो, व्होल मिल्क पावडर ३२ किलो, तेलसदृश पदार्थ १६८ लिटर व वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले ४१८ लिटर गाय दुधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले.
ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी व योगेश देशमुख यांनी विभागाचे सहआयुक्त सं. भा. नारागुडे व सहाय्यक आयुक्त उदय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईत विशेष पथक, नाशिक ग्रामीण व निफाड पोलिस ठाण्याचे पथक यांचे सहकार्य लाभले.