नाशिक: पुढीलवर्षी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या दादा भुसे यांच्या सूचना !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत आग्रही भूमिका मांडली. या प्रश्नावरून आजची बैठक चांगलीच गाजली.

दरम्यान, यंदा गत वर्षीच्या तुलनेत पाच टक्के, तर पावसाच्या ४२ टक्के पाणी कमी आहे. परतीच्या पावसाची साथ नसल्याने यंदा पाणीटंचाईला तोंड देताना ऑगस्ट २०२४ डोळ्यांसमोर ठेवून पिण्याच्या पाण्याचे गंभीर नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. राहुल आहेर, नितीन आहेर, प्रा. देवयानी फरांदे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच दिसायला लागल्या आहेत.

आजच्या बैठकीत चांदवड, देवळा मतदारसंघातील विविध भागातील शेतकऱ्यांनी बैठकीत गर्दी केली. धरणातून पाणी सोडल्याने वरच्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते, तर खाली मात्र पाणी सोडूनही मिळतच नाही, अशा परस्परविरोधी भूमिका घेऊन तक्रारी मांडायला आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे बैठक गाजली.

डॉ. राहुल आहेर यांनी पाण्याचा प्रश्‍न गंभीरपणे हाताळावा. यात राजकारण होऊ नये. राजकीय मतभेद आणि गावागावांमध्ये धुसफूस सुरू होऊ नये, अशी मागणी करीत आवर्तन सोडण्यात नियोजन नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप केला.

बैठक घेतली आटोपती:
श्री. भुसे म्हणाले, की यंदा परतीच्या पावसाची साथ नाही. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. परतीच्या पावसामुळे मागील वर्षी धरणसाठा राखला गेला. यंदा परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन नियोजन करावे. राहिलेल्या पाण्यात फळबाग वाचविण्यास प्रसंगी प्राधान्य द्यावे, अशा सूचना देत काही मिनिटांतच बैठक आटोपती घेतली. बैठक झाल्यानंतर भुसे त्वरित निघून गेले. मात्र ते गेल्यानंतरही बराच वेळ शेतकऱ्यांमध्ये आपापसांत गटागटाने पाणीटंचाईच्या परस्परविरोधी भूमिकांवरून चर्चा सुरूच होत्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790