नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ॲमेझॉन सेलसाठी लॉटचे कपडे व वस्तू घेऊन देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने महिलेला 31 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी म्हणजेच फसवणूक झालेली महिला ही रेडिमेड कपडे व इतर वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करते, तसेच ठिकठिकाणी सेल लावते.
दरम्यान, संशयित आरोपी किशोर शिवाजी उगले (वय 45, रा. शिवशक्तीनगर, सरस्वती चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) याने फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. ॲमेझॉन सेलसाठी तुम्हाला लॉटचे कपडे व इतर लॉटच्या वस्तू स्वस्तात घेऊन देतो, असे आमिष दाखविले. त्यावर महिलेने विचार करून लॉटचे कपडे व इतर वस्तू घेण्यास संमती दिली. त्यानुसार आरोपी किशोर उगले याने महिलेकडे पैशांची मागणी केली.
त्यानुसार या महिलेने यूपीआय, आरटीजीएसमार्फत मोबाईल फोनवर वेळोवेळी सुमारे 30 लाख 96 हजार रुपयांची रक्कम आरोपी किशोर उगले याला दिली; मात्र बरेच दिवस उलटूनही ॲमेझॉन सेलसाठी लॉटचे कपडे व लॉटच्या इतर वस्तू काही आल्या नाहीत.
त्यामुळे फिर्यादी महिलेने आरोपीशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्याने फोन घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी केली.
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपी किशोर उगले याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०२७१/२०२३), गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करीत आहेत. हा फसवणुकीचा प्रकार दि. 13 डिसेंबर 2022 ते 6 जून 2023 या कालावधीत पाथर्डी सर्कल परिसरात घडला.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790