नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एका वेबसाइटवर नाशिकमधील दोन सख्ख्या बहिणी असलेल्या तरुणींचे फोटो परवानगी न घेता अपलोड करून त्याखाली अश्लील कमेंट्स केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पीडित तरुणींनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोस्ट करणाऱ्या अकाउंटसह संबंधित वेबसाइट व टेलिग्राम ग्रुपवर सायबर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१५ व १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास तरुणींचे फोटो एका वेबसाइटवर तीन वेगवेगळ्या अकाउंटवरून अपलोड झाल्याची माहिती पीडितांना मिळाली. या फोटोंवर अश्लील कमेंट केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत याप्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना दिले.
पोलिसांनी कागदपत्रे व संबंधित लिंकची पडताळणी केल्यानंतर दोन्ही तरुणींनी नुकतीच सायबर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सायबर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दोन्ही तरुणींचे फोटो संशयितांपर्यंत कसे पोहोचले, संबंधित वेबसाइटवर अपलोड करण्याचे कारण काय, बदनामीमागे कोणाचा काय उद्देश आहे यासंदर्भात सायबर पोलिस पुढील करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पीडिताच्या ओळखीतल्या एखाद्याचा याप्रकरणाशी संबंध आहे का, याबाबत पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, या स्वरूपाचे गुन्हे वाढत असल्याने सोशल मीडियावर सर्व अकाउंट नागरिकांनी ‘प्रायव्हेट पॉलिसी लॉक’ करून ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790