नाशिक (प्रतिनिधी): दोन-तीन दिवसांपासून पावसाने नाशिककरांवर कृपा केली असून जायकवाडी धरणातील साठा ३८ टक्क्यांवर गेल्यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार, ९० टक्केपर्यंत भरलेल्या गंगापूर धरण समूहात ६१ टक्के पाणी सोडून उर्वरित २९ टक्के पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याची वेळ टळली आहे.
आता, ७४ टक्क्यांपर्यंत पाणी ठेवण्यास मुभा आहे. यानियमानुसार आता मे महिन्यापर्यंत नाशिककरांना पाणी पुरणार आहे. तर मागील अनुभव लक्षात घेता ऑक्टोबरअखेरपर्यंत परतीच्या पावसाची कृपा राहिल्यास जायकवाडी धरण ५६ टक्के भरून गंगापूर धरणसमूहात ८२ टक्के पाणी ठेवणे शक्य होणार आहे.
यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कृपा दाखवल्यानंतर पुन्हा या पावसाने दडी मारली होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये ९० टक्क्यांपर्यंत जरी पाणीसाठा असला तरी जायकवाडी धरणासाठी आवश्यक पाणी सोडता येत नव्हते.
समन्यायी पाणीवाटप तत्वानुसार नाशिकच्या धरणांमधील पाणी मराठवाड्याकरीता जायकवाडीत सोडावे लागणार आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालात दिलेल्या पहिल्या पर्यायानुसार आता गंगापूर धरणात ७४ टक्के पाणीसाठी ठेवण्यास मुभा मिळते. मागील ४ दिवसांच्या पावसामुळे गंगापूर धरण समूहातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पहिल्या पर्यायानुसार जर ३८ टक्क्यांपेक्षा जायकवाडीत कमी पाणीसाठा असेल तर गंगापूर धरण समूहात ६१ टक्के पाणी ठेवून उर्वरित पाणी सोडण्याचे संकट टाळणार आहे.