नाशिक (प्रतिनिधी): रेल्वे ई-तिकिटांचा अवैध व्यवसाय करणाऱ्यास रेल्वे सुरक्षा बल आणि भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात रेल्वे सुरक्षा बलाची सर्च मोहीम सुरू आहे. प्रवाशांना तिकिटांच्या काळाबाजाराबाबत काही माहिती असल्यास त्वरित रेल्वे सुरक्षा बलाशी अथवा रेल्वेच्या प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
रफिक महम्मद नाईक (रा. हेमकुंज अपार्टमेंट, पारिजात हॉस्पिटलजवळ, जुने सिडको) असे संशयिताचे नाव आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी चेतन फडणीस यांनी माहिती दिली.
पुण्याच्या सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘आरपीएफ’चे उपनिरीक्षक रवींद्र कुमार, कर्मचारी विशाल पाटील व सहकाऱ्यांनी भद्रकाली पोलिसांच्या मदतीने एका प्रवाशाच्या निवासस्थानी धाव घेतली.
प्रवाशाने डेटामध्ये दिलेला वैयक्तिक यूजर आयडी आणि ई- तिकिटाबद्दल चौकशी केली. त्यांनी सांगितले, की वापरकर्त्याच्या आयडीवरील एक आयडी त्यांचा होता, ज्यावरून त्यांनी आईला ई-तिकीट दिले होते.
सहकारी रफिक महम्मद नाईक तिकीट काढून कमिशनसाठी गरजू प्रवाशांना विकतो. त्यानंतर रफिक महम्मद नाईक याला आरपीएफ पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
चौकशीत त्याने वैयक्तिक यूजर आयडी बनवून गरजू प्रवाशांना किरकोळ पैसे घेऊन तिकिटे देत असल्याचे तसेच रेल्वे ई-तिकिटाचा काळाबाजार करीत असल्याचे कबूल केले.
व्यवहारासाठी वापरत असलेला मोबाईल जप्त करून तपासल्यावर साडेसात हजारांची ताजी तिकिटे आणि २३ हजार ४१९ किमतीची १६ जुनी तिकिटे आढळली.
अशी सुमारे ३१ हजारांची २० तिकिटे दोन स्वतंत्र न्यायाधीशांसमोर जप्त करून पंचनामा करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कुमार तपास करीत आहेत.