नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाबाधित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना एका संशयिताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.५) समोर आलीये.
वडाळानाका येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय पुरुष बाधित व्यक्तीच्या संपर्कातील असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी समाज कल्याण वसतिगृहामध्ये घेऊन जात असतांना “मला खासगी हॉस्पिटलला जायचे आहे” असे त्यांनी सांगितले. कोणत्या हॉस्पिटलला जायचे हे सांगितले नसल्याने त्याला झाकीर हुसैन रुग्णालयात किंवा अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांना रुग्णवाहीकेमध्ये बसवण्यात आले. मात्र रुग्णवाहिका सुरु होताच या व्यक्तीने दरवाजा उघडून पळ काढला. थोड्या अंतरावर असलेल्या स्वत:च्या दुचाकीवर बसून पाळण्याच्या बेतात असलेल्या या व्यक्तीला गाडीला किक मारतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या प्रकारानंतर नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांनी “कोरोना संशयित असो किवा बाधित असो, त्यात घाबरून जाण्याच काही कारण नाही, आरोग्य यंत्रणा आपल्या परीने रुग्णावर योग्य ते उपचार करते आहे.” असे नागरिकांना सांगितले आहे.