नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यासह शहरात गेल्या महिनाभर विश्रांती घेतलेला पाऊस गुरुवार पहाटेपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारी पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी ही सकाळपासून वरुणराजा बरसत आहे. दोन दिवसापासून सतत कोसळणार्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तसेच अनेक दिवसांनी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी चारचाकी चालवताना चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून आज दुपारी एक वाजता ५२० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला होता. दुपारी २ वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग 520 क्यूसेसने वाढवून 1040 क्यूसेस करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, नांदूरमधमेश्वर धरणातून आज 300 क्यूसेस विसर्ग सुरु होता. दुपारी 3.00 वाजता पाण्याचा विसर्ग 1314 क्यूसेसने वाढवून एकूण 1614 क्यूसेस करण्यात येणार आहे. कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून पावसाचा जोर असल्याने कडवा धरणातून दुपारी 2 वाजता 848 Cuses ने कडवा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पुणेगावमधून 590 क्यूसेस तर दारणातून 1400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे.