नाशिक: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्ताने वाहतूक मार्गात बदल

नाशिक (प्रतिनिधी): तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्‍वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणासाठी होणारी भाविकांची गर्दी व ज्यादा एसटी बसच्या नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. ३) दुपारपासून सीबीएस ते टिळकवाडी सिग्नल मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. येत्या सोमवारी (ता. ४) श्रावणमासातील तिसरा सोमवार आहे. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी प्रदिक्षणेला मोठे महत्व असते.

यासाठी रविवारी दुपारपासूनच जिल्हाभरातील भाविक त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना होतात. यासाठी एसटी मंडळाच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकातून (सीबीएस) जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथे जाण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सीबीएस ते टिळकवाडी सिग्नल हा मार्ग एसटी बस व शासकीय वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी २ वाजेपासून ते सोमवारी (ता.४) रात्री ८ वाजेपर्यंत हा मार्ग बंद असणार आहे.

यामार्गावरून सीबीएसकडून टिळकवाडी चौफुलीकडे जाणारी वाहने सीबीएस सिग्नल येथून त्र्यंबकनाका, हॉटेल राजदूत, त्र्यंबकरोड मार्गे इतरत्र जातील. किंवा सीबीएस सिग्नलकडून मेहेर, अशोक स्तंभ चौक, गंगापूररोडमार्गे इतरत्र जातील.

टिळकवाडी चौफुलीकडून सीबीएसकडे येणारी वाहने टिळकवाडी सिग्नल, सावरकर जलतरण तलाव, त्र्यंबकनाका, सीबीएस या मार्गे इतरत्र जातील किंवा टिळकवाडी सिग्नल येथून पंडीत कॉलनी मार्गे गंगापूररोड, अशोक स्तंभ मार्गे इतरत्र जातील.

यासह मेळाबसस्थानक ते हॉटेल राजदूत हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात आला असून हॉटेल राजदूतकडून मेळा बसस्थानकाकडे येणार्‍या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

अतिरिक्त ताण:
ग्रामीण पोलिसांकडून त्र्यंबकरोडवरील खंबाळे, पहिने येथे खासगी वाहनांसाठी वाहनतळ केले आहे. वाहनांमुळे भाविकांच्या त्रास होण्याची शक्यता गृहित धरून सदरचे नियोजन करण्यात आलेले आहे. तर जालना येथील आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे जिल्ह्यातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर शहर-गामीण पोलिसाकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. श्रावणी तिसरा सोमवार आणि बंदोबस्त याचा अतिरिकत् ताण पोलिसांवर आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790