नाशिक (प्रतिनिधी): चिंचा खाऊ घालण्याच्या बहाण्याने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करणार्या नराधम आरोपीला जिल्हा न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा शिवारात सदरची घटना गेल्या १ जून २०२२ रोजी दुपारी घडली होती.
पवन लहू महाले (१८, रा. नळवाडपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे १ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आरोपी पवन याने ३ वर्षे ९ महिन्यांची मुलीला चिंचा खाऊ देण्याचा बहाणा करून बाजुला शेतात नेले आणि तिच्यावर लैंगिंक अत्याचार केले होते.
याप्रकरणी दिंडोरी पोलीसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला जोरणपाडा परिसरातून अटक करण्यात आली होती.
तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय औटे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती पी.व्ही. घुले यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती डी.डी. भिडे, श्रीमती लीना चव्हाण यांनी कामकाज पाहताना पाच साक्षीदार तपासले.
परिस्थितीजन्य पुरावे साबित झाल्याने न्या.श्रीमती घुले यांनी आरोपी पवन महाले यास २० वर्षे सक्तमजुरी, ५० हजारांचा दंड ठोठावला.
दंड न भरल्यास एका वर्षाचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस संगीता राठोड यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सदरील गुन्ह्यातील तपासी पथकाला १० हजारांचे रिवॉर्ड जाहीर केले आहे.