नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरातील शोरुममधून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने भामट्याने सुमारे २० लाख रूपये किमतीची इलेक्ट्रीक कार पळवून नेल्याचा प्रकार घडली.
बराच वेळ होऊनही संशयित कारसह परत न आल्याने वितरकाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज प्रकाश साळवे असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कपील अशोक नारंग (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नारंग यांचे पाथर्डी फाटा भागात कार मॉल नावाचे शोरूम आहे.
इलेक्ट्रीक कार खरेदीचा बहाणा करून शोरूममध्ये आलेल्या संशयित साळवे याने विविध कारची व किमतींची माहिती घेतली. १९ लाख रूपये किमत असलेल्या इलेक्ट्रीक कार (जीजी २६ एबी ४८४८) त्याने पसंत केली.
यावेळी त्याने टेस्ट ड्राईव्हची इच्छा व्यक्त केल्याने नारंग यांनी कार त्याच्या ताब्यात सुपूर्द केली. सदरची घटना मंगळवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास घडली.
पाच ते सात तास उलटूनही संशयित कार न परतल्याने नारंग यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790