नाशिक: कंटेनरमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक; ‘एक्साईज’च्या कारवाईत कोटीचा मुद्देमाल जप्त

नाशिक (प्रतिनिधी): गोवा राज्यात निर्मिती केलेले विदेशी मद्याचा साठा अवैधरित्या वाहतूक करून नेणार्या कंटेनरला पाठलाग करून विंचूर चौफुली येथे पकडण्यात आला.

कंटेनरमध्ये विदेशी मद्याचे ११०० बॉक्स आढळून आले असून, कंटेनरसह विदेशी मद्य असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) येवला पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

कैलास पांडु लष्कर (३३, रा. शासकीय दुध डेअरी रोड, चक्कर बर्डी, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. एक्साईजच्या भरारी पथकाला गोवा राज्यातील विदेशी मद्याची अवैधरित्या कंटेनरमधून वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार पथकाने नाशिक-संभाजीनगर (औरंगाबाद) रोडवरील निफाड, विंचूर येथे सापळा रचला होता. एक्साईजच्या पथकाकडून सदरील संशयित कंटेनरचा शोध घेतला जात होता. त्यावेळी विंचूर चौफुली येथे संशयित कंटेनर (एमएच ४८ सीबी ४७७३) निदर्शनास आला.

पथकाने कंटेनरची नाकाबंदी केल्यानंतरही संशयित चालकाने कंटेनर पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने पाठलाग करून कंटेनरला विंचूर चौफुलीवरील पवन स्वीटमार्ट येथे अडविले.

कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे ५२ हजार ८०० रुपयांचे ११०० बॉक्स आढळून आले. सदरचे मद्य हे महाराष्ट्रात विक्रीस बंदी आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली. विदेशी मद्य, कंटेनर, मोबाईल, प्लॅस्टिकच्या बाटल्या असा १ कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

सदरची कामगिरी एक्साईजचे उपायुक्त डॉ. बा.ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभागाचे निरीक्षक विठ्ठल चौरे, संजय वाकचौरे, प्रवीण मंडलिक, अवधुत पाटील, संतोष मुंढे, विठ्ठल हाके, अमन तडवी, मुकेश निंबेकर यांनी बजावली. तपास संजय वाक्‌चौरे हे करीत आहेत.

“अवैध मद्याचा साठा, विक्री करण्यास मनाई आहे. यासंदर्भात माहिती वा तक्रार असल्यास संबंधितांनी ८४२२००११३३/०२५३२५८१०३३ यावर संपर्क साधावा.”- शशिकांत गर्जे, अधीक्षक, एक्साईज नाशिक.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790