नाशिक (प्रतिनिधी): राज्यभरात तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी परिक्षेला सुरुवात झाली आहे.
या परीक्षे दरम्यान गुरुवार (ता.१७) रोजी म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील दिंडोरी रोडवरील एका परीक्षा केंद्रा बाहेरून एका संशयितास वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल सह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात सुरुवात झाली आहे.
गुरुवार (ता.१७) रोजी दिंडोरी रोडवरील रिलायंस पेट्रोलपंप जवळील मधुर स्वीट शेजारील वेबइझी इन्फोटेक या परिक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती.
यावेळी परीक्षा केंद्राच्या समोरील एका चायनीज हॉटेल मध्ये सकाळी १० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
या ठिकाणाहून सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून दोन मोबाईल, हेडफोन, श्रवणयंत्र आणि एक टॅब, असे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून पोलीस ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची फोटो मिळून आला आहे.
हा संशयित ‘त्या’ परीक्षा केंद्रात कोणास मदत करत होता, यात आणि कुणाचं सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर आणि कर्मचाऱ्याकडून कारवाई करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
“राज्यभरात ठिक – ठिकाणी तलाठी पद भरतीसाठी परिक्षा सुरू आहेत .मधुर स्वीट जवळील वेबइझी इन्फोटेक बाहेरील परिसरात एक संशयित रित्या फिरत होता, म्हसरूळ पोलिसानी त्यास ताब्यात घेतले असता वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल मिळून आला.सदर संशयित हा परिक्षा केंद्रात कुणास माहिती पुरवत होता, यात आणखी कुणाचा सहभाग आहेत का? हे तपासा दरम्यान उघड होईल.” – किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक शहर.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790