नाशिक (प्रतिनिधी): वर्क फॉर्म होमच्या शोधात असताना चांगला परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने ४० वर्षीय व्यक्तीला तब्बल १६ लाख रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण पांडुरंग राजपूत (४०, रा. अमृता हाईटस्, उत्तमनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, ते वर्क फॉर्म होमच्या शोधात होते. जून महिन्यात ९९५०८९७९९९ या क्रमाकांवरून फोन आला.
सायबर भामट्याने त्यांना वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले. त्यासाठी टेलिग्रामवर दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठीचे काम दिले. राजपूत यांनी ऑनलाइन टास्क पूर्ण केले.
त्यानुसार त्यांना सुरवातीला काही प्रमाणात पैशांचा परतावाही मिळाला. त्यानंतर यांची टास्क पूर्ण केल्याची रक्कम त्यांच्या डॅशबोर्डवर दिसू लागली. ठराविक दिवसांनी सदर रक्कम काढता येईल, असे संशयिताने सांगितले.
मात्र त्यानंतर त्यांनी सदर रक्कम काढण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्या खात्यावर ती वर्ग झाली नाही. त्यामुळे त्यांनी संशयितांकडे संपर्क साधला असता, त्याने सदर रक्कम वर्ग करण्यासाठी काही प्रक्रिया असल्याचे सांगत वेगवेगळ्या बँकेचे खाते नंबर देत त्यावर पैसे टाकण्यास भाग पाडले.
अशारीतीने राजपूत यांनी १६ लाख ३ हजार २१० रुपये जमा केले. परंतु त्यानंतरही संशयिताकडून पैशांची मागणी सुरू राहिल्याने त्यांना संशय आला. सदर प्रकार ७ जून ते १० जुलै या दरम्यान घडला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.
“वर्क फॉर्म होमच्या नावाखाली सायबर भामट्यांकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. त्यामुळे असे काम करीत असताना कोणी पैसे भरण्यास सांगत असेल तर त्यातून फसवणूक होण्याचीच शक्यता जास्त असल्याने अशा प्रलोभनांना बळी पडू नये.”- रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक सायबर पोलिस ठाणे.