नाशिक (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन करताना रस्त्यावर इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत वाढ होते आहे. काळाची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘ई- शिवाई’ इलेक्ट्रिक बस अवगत केली आहे.
नुकताच नाशिकला दोन बसगाड्या प्राप्त झाल्या असून, लवकरच आणखी सहा बस उपलब्ध होणार आहेत. दरम्यान या ‘ई- शिवाई’तून प्रवाशांना नाशिक-पुणे महामार्गावर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
पुण्यासाठी नवीन सीबीएस बसस्थानकातून ‘ई- शिवाई’ गाडी सुटणार आहे. नाशिक रोड, चाकण व पुणे असा बसचा मार्ग असेल. महामंडळातर्फे ई- शिवाई प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर राज्यभरात पायाभूत सुविधांची उभारणी प्रक्रिया सुरू होती. महामंडळाच्या एनडी पटेल मार्गावरील आगार एकमध्ये इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत.
काही महिन्यांपासून ई-शिवाईची प्रतीक्षा कायम होती. नुकताच दोन बसगाड्या नाशिक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. आणखी सहा गाड्या लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
सर्व योजना असतील लागू:
नाशिक विभागातर्फे या बसगाड्या नाशिक- पुणे मार्गावर सोडल्या जात असून, प्रवास भाडे पूर्ण तिकिटासाठी ४७५ रुपये आणि अर्धे तिकीट रुपये २५५ रुपये आकारले जाणार आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिकासह अन्य सर्व सर्व योजना लागू राहतील.
या सुविधा मिळणार:
- ऑनबोर्ड युनिट आणि बस ड्रायव्हर कन्सोल
- एआयएस-१४० प्रमाणित वाहन ट्रॅकिंग प्रणाली
- पॅनिक बटण सुविधा
- प्रवासी घोषणा प्रणाली आणि ॲण्ड्रॉईड टिव्ही
- प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम, ड्रायव्हर स्टेट्स मॉनिटरिंग सिस्टम.
- पीआयएस डिस्प्ले बोर्ड
- हवा गुणवत्ता फिल्टर
- चालकाच्या केबिनमध्ये तापमान, आर्द्रता, हवा गुणवत्ता सेन्सर
- रिअल- टाइम कनेक्ट केलेले अल्कोहोल सेन्सर
- सस्पेंशन सेन्सर लोड
- प्रत्येक प्रवासी आसनासाठी लोड सेन्सर (प्रवासी मोजणी)
- टायर प्रेशर मॉनिटरिंग सेन्सर
- दोन जागांच्या गटासाठी यूएसबी स्वतंत्र चार्जर
- वाहन आरोग्य देखरेख उपकरण