नाशिक (प्रतिनिधी): एटीएम कार्डची अदलाबदल करून महिलेच्या खात्यातून परस्पर ६५ हजार ३०० रुपयांची रक्कम संशयितांनी लंपास केली.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तिघा अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिंगाडा तलाव येथील सुरेखा पाडवी ४ जुलैला सायंकाळी परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. अनेक प्रयत्न करूनही रक्कम निघाली नाही.
तेथे असलेल्या तिघा संशयितांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमची अदलाबदल करून पैसे निघत नसल्याचे सांगून निघून गेले. त्यांनी संशयित गेल्यानंतर पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्याकडे असलेले कार्ड डॅमेज असल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या बँकेत जाऊन चौकशी केली. खात्याचे स्टेटमेंट घेतले. त्यात ४ आणि ५ जुलैदरम्यान परस्पर ६५ हजार ३०० रुपयांची रक्कम काढले असल्याचे लक्षात आले.
त्यांनी त्वरित कार्ड बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंगळवारी (ता. ८) गुन्हा दाखल केला.
![]()


