नाशिक (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुटीमध्ये कामाच्या शोधात आलेल्या अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध देत बलात्कार व नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या संशयित दांपत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.
संशयित दांपत्याचा स्पा सेंटरच्या आडून कुंटनखान्याचा धंदा सुरू होता. तर, गेल्या काही महिन्यांपासून मोकाट संशयित दाम्पत्याला पोलिस कधी अटक करतात, याकडे लक्ष लागले आहे.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, खुशबू सुराणा, परेश सुराणा, अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्या संशयित दांपत्यांची नावे आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अकरावीतील विद्यार्थिनी उन्हाळी सुटीनिमित्त काम शोधत होती.
संशयितांचे शरणपूर रोडवरील टिळकवाडीत योगा वेलनेस स्पा असून, पीडित मुलगी या ठिकाणी आली होती. संशयित महिला व पुरुषाने कौटुंबिक परिस्थिती जाणून घेत तीन हजार रुपये पगारावर साफसफाई कामावर ठेवले.
दुसऱ्या दिवशी पीडिता कामावर आली असता, संशयित दाम्पत्याने तिला पिण्यास ज्यूस दिला. ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकल्याचा आरोप पीडितेने केला. शुद्धीवर आल्यानंतर ती दुसऱ्या रूममध्ये संशयित सुराणासमवेत होती.
तर संशयित महिला दोघांचे अश्लील चित्रीकरण करीत होती. ते चित्रीकरण दाखवत या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर एका ग्राहकानेही तिच्यावर बलात्कार केला.
मुलीने आईला आपबिती सांगितल्यानंतर सदर प्रकार पोलिसात पोहोचला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात संशयित सुराणा दाम्पत्याने अटक टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी (ता. ४) या अर्जावर सुनावणी होऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रीती घुगे यांनी अर्ज फेटाळून लावला.
विविध पोलिस ठाण्यात गुन्हे:
गेल्या काही दिवसात शहरात पुन्हा स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू झाले आहेत. बहुतांशी व्यवसायात संशयित सुराणा दांपत्याचा समावेश असल्याचे बोलले जाते.
या दांपत्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात फसवणुकीसह वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीसारखे गुन्हे दाखल आहेत. तर, गेल्या काही महिन्यांत या दाम्पत्याने दोन पीडितांना वाममार्गाला लावल्याचे गुन्हे दाखल आहेत.
पाथर्डी फाटा व अन्य ठिकाणी या संशयितांनी पुन्हा व्यवसाय थाटल्याची चर्चा असून, पोलिसांकडूनच पाठराखण केली जात असल्याचेही बोलले जाते. न्यायालयाच्या या दणक्यानंतरही त्यांना पोलिस अटक करतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.