नाशिक (प्रतिनिधी): लग्न झाल्यानंतर १८ दिवसातच मावशी आजारी असल्याचे कारण देत घरातून दागिने आणि रोकड घेऊन फरार झालेल्या नववधूला चांदवड पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने नववधूसह अटक करण्यात आलेल्या मध्यस्थी व इतर संशयित यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. या अटकेमुळे या टोळक्याने आणखी किती जणांची फसवणूक केली याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
कसमादे परिसरात लग्न झाल्यानंतर वधूकडून दागिने आणि रोकड घेऊन पसार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. असाच काहीसा प्रकार चांदवड तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने लग्न जमत नसल्याने पुरी गावातील ओळखीतील व्यक्तीस लग्नासाठी मुलगी शोधण्यास सांगितले. यानंतर संबंधिताने नांदेड जिल्ह्यातील एक मुलगी शोधली. त्यानंतर मोबाईल दोघांनी आपले फोटो एकमेकांना दाखविल्यानंतर पसंती झाली.
त्यानंतर मुलगी बेबी जगताप, तिची बहिण अश्विनी पाटील आणि मावशी संगीता या चांदवड येथील मध्यस्थीच्या घरी आल्या.
याठिकाणी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अडीच लाख रुपये रोख व ४८ हजार रुपयाचे दागिने मुलीच्या नातेवाईक यांना देण्याचे ठरले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात दोघांचे लग्न झाले.
लग्न झाल्यानंतर १५ दिवसांनी नववधू बेबी हिने नवऱ्याकडे नाशिकची मावशी आजारी असल्याचे सांगत तिला भेटून पुन्हा येते असा आग्रह धरला. अखेर नवऱ्याने तिला होकार दिल्यानंतर नवऱ्याने तिला नाशिक येथे मावशीच्या घरी आणून सोडले.
पुन्हा घरी येईल असे सांगून नववधू मावशीकडे निघून गेली. मात्र अनेक दिवस उलटूनही बायको घरी येत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याने समजताच त्याने याबाबत वडनेर भैरव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संशयित नववधू ही आपली बहिणी आणि मावशी सोबत चांदवड येथे बाजारात फिरत असताना पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून मध्यस्थी यास देखील अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजार केली असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.