नाशिक: कागदपत्रांची बॅग चोरीला, एसटी चालक-वाहकाच्या तत्परतेने तरुणाला ‘नवं जीवन’

नाशिक (प्रतिनिधी): एसटीच्या प्रवासात चालक- वाहकांना अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात. इगतपुरी-धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटीतील चालक वाहकांना असाच काहीसा अनुभव आला.

इस्रोमध्ये निवड झालेल्या एका तरुणाची बॅग ट्रेनमधून चोरीला गेली. चोराने ती बॅग एसटीमध्ये सोडून दिली होती. या बॅगेत १४ हजारांची रोख रक्कम होती.

मात्र प्रामाणिक बस चालक-वाहकाने त्या तरुणाला शोधून काढलं. बॅगेतील कागदपत्रं हरवल्याने तरुण आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होता. परंतु एसटी चालक-वाहकाच्या तत्परतेने त्याचे प्राणही वाचले.

एसटी बस वाहक गोरख शिंदे यांनी काय सांगितलं?:
कालची घटना… सकाळी माझे चालक पी आर खाडे आणि मी दुपारी 12:45 वाजता इगतपुरी- कसारा एसटीवर होतो. तिथून आमची गाडी कसारा-धुळे असा प्रवास करणार होती. आम्ही कसारा येथे गेलो असता, सर्व प्रवासी गाडीतून उतरले. पाऊस जास्त असल्या कारणाने मी बसच्या खिडक्या बंद कराव्या, या हेतूने मागे गेलो. त्यावेळी मला एक बॅग आढळली.

चालक पी. आर. खाडे यांना मी सापडलेल्या बॅगबद्दल सांगितलं. आम्ही ती बॅग परत करण्याच्या हेतूने उघडून बघितली. तर राजरत्न प्रभाकर कोकाटे या व्यक्तीची ती बॅग असल्याचं बॅगमध्ये सापडलेल्या त्यांच्या ओळख पत्रावरुन समजलं. त्यांचे गाव एकलहारा (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) असा पत्ता आढळला. त्याच्यावर जे फोन नंबर होते, ते दोन्हीही नंबर बंद लागले.

आम्हाला बॅगमध्ये नंबर शोधत असताना, त्याच्या भावाचा नंबर मिळाला. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला व त्यांना बॅग मिळाल्याची माहिती दिली. मग माझे चालक पी. आर. खाडे यांनी वारंवार कॉल करत असताना त्यांच्या लक्षात आले की या फोनला रिचार्ज नाही. खाडेंनी त्या मुलाच्या दोन्ही नंबरला प्रत्येकी १६० व ३२० रुपयांचा रिचार्ज केला. पुन्हा त्या मुलाशी आम्ही संपर्क केला. यावेळी फोन लागल्यावर त्या मुलाने सांगितलेली हकिकत आम्हाला धक्का देणारी होती.

तो म्हणाला.. “माझी बॅग नाशिक ते इगतपुरीच्या दरम्यान ट्रेनमधून कोणीतरी चोरली आहे. तशी तक्रार मी रेल्वे पोलीस ठाण्यात केली आहे.” मग आम्ही त्याला कळवले की तुझी बॅग आम्हाला सापडली आहे. त्या बॅगमध्ये आतल्या कप्प्यात १४ हजार रुपये होते. त्याचे इयत्ता दहावीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे सर्व ओरिजनल डॉक्युमेंट होती. हे सर्व ऐकल्यावर त्या मुलाने थेट बॅग घेण्यासाठी धुळे गाठले.

धुळे येथे आल्यावर तो मुलगा आम्हाला म्हणाला “जर मला माझी बॅग मिळाली नसती तर आत्महत्या करणार होतो!” दुदैवाने तो मुलगा दिव्यांग आहे. विशेष म्हणजे तो सध्या जिल्हा परिषद हिंगोली येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पुढे आम्ही त्याची चौकशी केली असता, त्या मुलाची निवड इस्रोमध्ये झाली आहे, असे आम्हाला त्याच्याकडून कळले. त्या नोकरीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (कागदपत्रे पडताळणी) साठी तो मुंबईला निघाला होता. मजेशीर गोष्ट म्हणजे ज्या चोराने ही बॅग चोरली, त्याने वरच्या कप्प्यात १७०० रुपये होते, ते काढून घेतले व ती बॅग बसमध्ये सोडून गेला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790