नाशिक (प्रतिनिधी): सोशल मिडीयात सप्तशृंगी गडाचे नाव देत दरड कोसळल्याचे व अपघाताचे चुकीचे, अवास्तव व भीतीदायक वर्णन करुन काही अपप्रवृत्तींनी व्हिडीओ पसरविण्याने सप्तशृंगी गडावर भाविक व पर्यटकांच्या नियमित गर्दीवर परीणाम झाला आहे.
दरम्यान भाविक व पर्यटकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता दर्शनासाठी येण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या पूर्व – पश्चिम पर्वत रांगते असलेले आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंग गड निसर्गसौदर्यांची उढळण करीत हिरव्यागार शालूने नटला आहे. त्यात देव दर्शन, पुजा विधी, धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला अधिक श्रावण मास सुरु आहे.
मात्र १२ जुलै रोजीच्या बसच्या अपघातानंतर सोशल मिडीयात जुने व्हिडीओ, मोकळा रस्ता व खोल दरी याचे व्हिडीओ तयार करून सप्तशृंगगड रस्ता बंद असल्याचे अवास्तव भासविले जात आहे.
यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. याचा प्रतिकूल परिणाम विविध स्वरुपाचे व्यावसायिक यांचेवर पडत आहे.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे भक्त देशभरात आहेत. जागृत देवस्थान असा सर्वत्र परिचय या स्थानाचा आहे. मात्र सोशल मीडियाचा गैरवापर कुहेतूने करून सामाजिक स्वास्थ्याला आव्हान देणाऱ्या काही अपप्रवृत्ती सक्रीय झाल्या आहेत.
भाविकांमधे गैरसमज पसरु नये यासाठी सप्तशृंगी देवी न्यास व नांदुरी ग्रामपंचायत यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सप्तशृंग गडावर जाण्यासाठी रस्ता सोयीचा व सुरक्षित असून वाहने विना रोकटोक जात असल्याने भाविकांनी दर्शनाचा लाभ मुक्त मनाने घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.