नाशिक (प्रतिनिधी): महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी सदरचा गुन्हा अमरावती शहर राजपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाचे नाशिकरोड अध्यक्ष संतोष पोपट गाडेकर राहणार जिजामाता नगर, पेंढारकर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड यांनी फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की, अमरावती शहर येथील राजपेठ पोलीस ठाणे हद्दीत 30 जुलै रोजी व्याख्यानादरम्यान शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानाचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा फुले, राजाराम रॉय, व शिर्डी येथील साईबाबा यांच्याविषयी भाषणात धर्माचा अपमान करण्याचा उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य केले.
सुमारे तीन तासांच्या भाषणात संभाजी भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल अतिशय हीन दर्जाची भाषा वापरली आहे. त्यात शिवीगाळ करून असभ्य भाषा वापरली गेली आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शिर्डी येथील साईबाबा यांच्याबाबत वाक्य वापरताना एका ठराविक समाजाचा उल्लेख करीत वाईट-साईट शब्दांचा वापर केला आहे. याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचे गाडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
संभाजी भिडे यांची अशी विधाने, मजकूर, शिव्या, द्वेष हा वृत्तवाहिन्यांमधून तसेच समाजमाध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे, असे बोलून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवून, अशा प्रकारची विधाने करून शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर दोन समाजांत धर्मात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, त्यांच्या या मनोवृत्तीला आळा बसावा म्हणून सदर समाजाची बेअब्रू केली म्हणून त्यांच्याविरुद्ध फिर्याद देत असल्याचे गाडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 295, 153 (अ)298,500 प्रमाणे गुन्हा दाखल करून अमरावती शहर राजपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. सभांजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी मंगळवारी नाशिकरोड पोलिसांत धाव घेतली.
यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांनी मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची समजूत काढून गुन्हा दाखल करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आणि गुन्हा दाखल केला.
यावेळी माजी आमदार योगेश घोलप, कामगार नेते जयंत गाडेकर, युवा पदाधिकारी योगेश गाडेकर, व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव, माजी नगरसेवक भय्या मनियार, शंकर मंडलिक, केशव पोरजे, विशाल गाडेकर, रवीद्र पेठकर, संतोष पुंड, जनार्दन ढोकणे, सुनील पुंड, सुनील गाडेकर, आदेश जाधव, कचेश्वर पवार, विजय गाडेकर, विकास गिते, आदर्श गाडेकर, पुरुषोत्तम फुलसुंदर, भारत जेजुरकर, साहिल जाधव, रोहित जाधव, प्रदीप गाडेकर, सागर महाजन, संजय अढांगळे, सुनील गांगुर्डे, किशोर आहिरे आदी उपस्थित होते.