250 Crore Fraud: ‘कलकाम’च्या दोघांना ठाण्यातून अटक; नाशिक ‘इओडब्ल्यू’ची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): बहुचर्चित कलकाम रियल इन्फ्रा लिमिटेड कंपनीने फिक्स आणि रिकरिंग आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह परराज्यांतील गुंतवणूकदारांना तब्बल सुमारे २५० कोटींचा गंडा घातला.

या प्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने ‘कलकाम’चा संचालक विजय सुपेकर आणि मार्केटिंग डेव्हलपमेंट डायरेक्टर तुषार सोनार या दोघांना ठाण्यातून अटक केली आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील गुंतवणूकदारांची सुमारे ३० कोटींची फसवणूक कंपनीने केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.

कलकाम रियल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबईतील वाशी येथे असून, कंपनीचे चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी व विजय सुपेकर, सुनील वांद्रे हे संचालक आहेत; तर तुषार सोनार, देवानंद शर्मा, संतोष थोराटे, संदेश पडियार, अशोक बागूल हे मार्केटिंग डेव्हलपमेंट डायरेक्टर आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

हे सर्व संशयित असून, त्यांच्याविरोधात फसवणुकीसह एमपीआडी अंतर्गत (संघटित गुन्हेगारी) राज्यभरात नऊ गुन्हे दाखल आहेत. कलकाम कंपनीत फिक्स डिपॉझिटवर ३९ महिन्यांत दीडपट आणि रिकरिंग डिपॉझिटवर ६५ महिन्यांत दुप्पट रकमेच्या परताव्याची स्कीम होती. त्यासाठी कंपनीने महाराष्ट्रासह परराज्यांत सीनिअर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह (एजंट) यांची नेमणूक केलेली होती.

कंपनीने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यांमध्ये विस्तार करीत आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. कंपनीमार्फत २०१९ पर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळाला; परंतु त्यानंतर कंपनीने परतावा देणे बंद केले. या प्रकरणी नाशिकसह राज्यात नऊ पोलिस ठाण्यांमध्ये कलकाम कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये ३० कोटींची फसवणूक:
कलकाम कंपनीचे मुंबई नाका परिसरातील माधव प्लाझा येथे कार्यालय होते. योगिता बैरागी यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिसांत गेल्या १२ ऑगस्ट २०२२ ला आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून, त्यानुसार फिक्स व रिकरिंगच्या ३४२ गुंतवणूकदारांनी एक कोटी १७ लाख २९ हजार ५५३ रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचा परतावा म्हणून कंपनीकडून दोन कोटी पाच लाख ५८ हजार ८४५ रुपये देणे असताना कंपनीने परतावा दिलेला नाही. पोलिस तपासात नाशिक शहर-जिल्ह्यातील फसवणुकीची रक्कम सुमारे ३० कोटींपर्यंत पोचली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

नाशिक पोलिसांकडून अटक:
कलकाम कंपनीचा चेअरमन विष्णू दळवी (रा. सिंधुदुर्ग) हा पसार असून, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा संचालक विजय सुपेकर (४३) व तुषार सोनार (४०) या दोघांना ठाण्यातील नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. दोघांना गुरुवारी (ता. २७) न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कंपनीविरोधात राज्यात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल असूनही अद्याप एकाही संचालकाला अटक नव्हती.

नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांना पहिल्यांदाच अटक केली असून, एपीआयडी कलम लावण्यात आलेले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here