नाशिक (प्रतिनिधी): कारागृहातून सुटताच घरफोडीची मालिका लावणारा सराईत पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. संशयिताच्या अटकेने अकरा गुन्हे उघडकीस आले असून, त्याने आजपर्यंत २५ हून अधिक घरफोड्या केल्याचे पुढे आले आहे.
या घटनेत चोरीचे सोने – चांदी खरेदी करणाऱ्या सराफालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल १२ लाख १८ हजार ऐवज जप्त करण्यात आला.
शंकर श्यामराव कापसे, असे अटक केलेल्या संशयितांचे नावे असून, तुषार चंद्रकांत शहाणे या सराफ व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे.
शहर गुन्हे शाखा युनिट १ चे जमादार रवींद्र बागूल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सराईत कापसे हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर पडला असून, त्याने अनेक घरफोड्या केल्या आहेत.
तसेच तो मालधक्का रोडवरील गुलाबवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असता, त्याने प्रथम आडगाव पोलिस ठाणे हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली.
अधिक तपासात त्याने पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, नाशिक रोड व मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत अवघ्या काही दिवसात साथीदाराच्या मदतीने अकरा घरफोड्या केल्या. चोरीचा माल तुषार शहाणे यास विक्री केल्याची माहिती दिली.
त्यामुळे पोलिसांनी शहाणे यास ताब्यात घेतले असता, त्याने चोरीचा ऐवज विकत घेतल्याचे कबूल केले. संशयिताच्या ताब्यातून सुमारे १८० ग्रॅम वजनाचे सोने व दोन किलो वजनाची चांदी असा सुमारे १२ लाख १८ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
दोघा संशयितांना न्यायालयाने मंगळवार (ता. २५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित कापसे अट्टल चोरटा असून, त्याने पंचवीसहून अधिक घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. तर सराफ व्यावसायीक शहाणे याच्यावर यापूर्वीही चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे व युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, जमादार रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, नाजीम पठाण, शरद सोनवणे, संदीप भांड, पोलिस नाईक प्रशांत मरकड, महेश साळुंखे, विशाल काठे, विशाल देवरे, राहुल पालखेडे व चालक अण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने केली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790