नाशिक (प्रतिनिधी): भगूर परिसरातील लोकमान्य टिळकपथ या ठिकाणी टोळक्याने एका घरात घुसून धुडगूस घालत घर जाळून टाकण्याची धमकी दिली.
प्रेमविवाहाच्या घटनेने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांतील ९ संशयितांना पोलिसांनी अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित गोरख कर्पे, निशा कर्पे, गणेश सुरेश व्यवहारे, करण वाघचौरे, फकिरा कर्पे, शंकर कर्पे, श्याम कर्पे, शुभम कर्पे व अक्षय मोहन वाघचौरे (सर्व रा. भगूर ता. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मंगल अशोक लकारिया (रा. टिळक पथ, भगूर) यांच्या फिर्यादीनुसार, ३ जुलैला त्यांचा मुलगा अमोल लकारिया याने संशयितांपैकी एकाच्या १९ वर्षीय मुलीशी कोर्टात प्रेमविवाह केला.
या विवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान, दोघांनी विवाह केल्यानंतर एक आठवडा गावात राहण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास मंगल, त्यांचे पती, मुलगा, सून व मुली घरी असताना संशयित गोरख कर्पे, त्याची पत्नी व इतर नातेवाइकांनी लकारिया यांच्या घरी आले आणि त्यांनी मुला-मुलीला बघायचे असल्याचे म्हणत, त्यांच्या दरवाजाला लाथ मारुन घरात शिरले.
त्या वेळी संशयितांनी लकारिया कुटुंबास शिवीगाळ करीत मारहाणही केली. घरातील कपाटाच्या काचा फोडल्या. दुचाकीचे नुकसान केले. तसेच, दमदाटी करीत घर जाळून टाकण्याची धमकी दिली.
दीर योगेश लकारीया तसेच नागरिकांनी सदर वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच, देवळाली कँम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पी. के. गिते, हवालदार राजेंद्र गुंजाळ घटनास्थळी दाखल झाले.
फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने संशयितांची जामीनावर मुक्तता केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हवालदार गुंजाळ तपास करत आहेत.