नाशिक (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील कामकाज प्रगतिपथावर आले असून काही ठिकाणाचे कामकाज संथगतीने सुरु आहे.
या महामार्गाच्या कामामुळे घोटी- सिन्नर महामार्गावर ठिकठिकाणी चिखल आणि राडारोडा झाला आहे. साइडपट्ट्या नसल्याने पावसात दररोज वाहन घसरण्याचे अपघात होत आहेत. आज एकाच दिवसाच सहा ट्रक घसरून उलटले आहेत.
औरंगाबादवरून डाक पार्सल घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मालवाहू गाडी रस्त्यावरून घसरली त्यापाठोपाठ ३ गाड्या घसरल्याने गाड्या पलटी झाल्या. त्यामुळे महामार्गावर साईटपट्ट्यांचा भराव करावा अशी मागणी पुढे येत आहे.
इगतपुरी तालुक्याला छेदून हा मार्ग जात असल्याने घोटी- सिन्नर मार्गाच्या अनेक ठिकाणी लगतच समृद्धीचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी या मार्गाची वाट लागली आहे.
त्यातच काही दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने घोटी -सिन्नर मार्गावर तालुक्यातील पिंपळगाव मोर आणि बेलगाव तऱ्हाळे या दोन गावांच्या साधारण दोन ते पाच किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.
यामुळे दररोज दुचाकी स्वारांसह लहान मोठी वाहने घसरून पलटी होत आहेत. बेलगाव तऱ्हाळे फाटा परिसरात तसेच पिंपळगाव मोर शिवारात रस्त्यालगत झालेला चिखल तसेच महामार्गाला साईड पट्याच नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या खाली उतरून पलटी होत आहेत.