नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीवरून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने गस्ती दरम्यान पाठलाग करून जेरबंद केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या दरोडा व शस्त्र विरोधी पथकाला गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गुन्हे सिताराम कोल्हे यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
या दरम्यान, दरोडा व शस्त्र विरोधी पथक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत असतांना शिवपुरी चौक, नवीन नाशिक येथे दोन तरुण काळ्या रंगाच्या बजाज पल्सरवरून वरून हातात धारदार कोयते भिरकवित मोठमोठ्याने ओरडून दहशत माजवित जात असतांना पथकाला दिसले.
त्यांचा पाठलाग करून दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने आकाश प्रल्हाद पवार (१८,रा. गणेश चौक, मयुरी गार्डन, मोरवाडी, दत्तमंदीर, काळे यांच्या गिरणी समोर,नवीन नाशिक) ,राशिद हारून खान (१९ ,राह. शिवपुरी चौक, पंडीत नगर, नवीन नाशिक) यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ०२ धारदार कोयते व १ बजाज पल्सर मोटार सायकल हस्तगत करून दोघांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला.