नाशिक (प्रतिनिधी): तुमचे गूगल पे अकाउंट ब्लॉक झाले आहे ते अनब्लॉक करून देण्याच्या बहाण्याने भामट्याने युवकाच्या अकाउंट वरून पावणे तीन लाख रुपये लांबवले आहेत.
बँक खात्यातील पावणे तीन लाखाची रक्कम परस्पर ऑनलाईन लांबविल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुगल पे अकाऊंट अनब्लॉक करून देण्याच्या बहाण्याने डेबिट कार्डची माहिती मिळवित ही फसवणूक करण्यात आली आहे.
या फसवणूक प्रकरणी संजय छनुलाल सेऊत (२५ रा.पार्वती चौक,कामगारनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संजय सेऊत यांच्याशी गेल्या १८ एप्रिल रोजी भामट्यांनी संपर्क साधला होता.
९५६४०३९६१९ या मोबाईल धारकाने तुमचे गुगल पे अकाऊंट ब्लॉक झाल्याचे सांगून त्यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळविली. त्यानंतर त्याने इंटरनेच्या माध्यमातून दोन ते तीन दिवसात बँक खात्यातील २ लाख ७१ हजार १०२ रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. ही रक्कम परस्पर ऑनलाईन काढण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.