नाशिक (प्रतिनिधी): पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.
सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे एकाने गावठी पेट्रोल बॉम्ब व सुतळी बॉम्ब नेऊन एका किराणा दुकानदाराला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे…
मिळालेल्या माहितीनुसार, एकाने आपल्या सोबत आणखी एकाला घेऊन तेलाच्या १५ किलोच्या रिकाम्या डब्यात ठेवलेले हे दोन बॉम्ब घेऊन दोघे गावातीलच आंबेकर यांच्या किराणा दुकानात गेले. तेथे छऱ्याची गावठी पिस्तूल दाखवत आंबेकर यांच्याकडे ५ लाखांची खंडणी मागितली.
खंडणी दिली नाही तर बॉम्बने दुकान उडवण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडल्याचे समजते. भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांच्या भीतीने धमकी देणारा पळाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बची खात्री केली. त्यानंतर तातडीने मालेगाव येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
त्यांनी दोन्ही बॉम्ब आज सकाळी निकामी केल्यानंतर पोलीस मुख्य संशयित विष्णू भाबड याचा शोध घेत आहेत. भाबड याने रात्रीचा प्रकार घडल्यानंतर घरी जाऊन झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते. भाबड याने स्वतः बॉम्ब बनवला की दुसऱ्या कुणाकडून बनवून घेतला याबाबत पोलीस तपास करीत आहेत.