नाशिक (प्रतिनिधी): शहरात डेंग्यू रुग्ण वाढत असल्याचे चित्र असून जानेवारीपासून बाधितांचा आकडा १०३ झाला आहे. यंदाच्या जून महिन्यात १३ डेंग्यूचे रुग्ण आढळले.
पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे शहरात दरवर्षी स्वाइन फ्लू, डेंग्यू, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यंदा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिसत नसला तरी, डेंग्यूचे तेरा रुग्ण आढळले आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पुढच्या तीन- चार महिन्यात पावसाचा अंदाज असल्याने नाशिककरांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
विशेषत: पावसाळ्यात डेंग्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र जूनमध्ये रुग्णांचा आकडा वाढून तो तेरावर गेला आहे.
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून ‘एडिस इजिप्ती’ प्रजातींच्या डासांपासून होता. पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये साचलेले पाणी, नारळ, टायर, पाण्याचे डबके यामुळे डेंग्यू होण्याची शक्यता असते.
नागरिकांनी घराजवळचा परिसर स्वच्छ करून कुठेही पाणी साठणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, डेंग्यू बाधितांचा आकडा वाढत असल्याने वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला नागरिकांची चिंता असेल असे वाटत होते. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असून शहरात कुठेही नियमितपणे पेस्ट कंट्रोलचे काम होत नसल्याची ओरड आहे.