नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली असून आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम होती आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता.
हवामान खात्याने कालपासून अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आला आहे. तालुक्यात आज दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने घोटी, इगतपुरी व ग्रामीण भागासह पाणलोट क्षेत्रांतही संततधार कायम होती.
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता.
मात्र मागील आठवड्याभरापासून मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापून टाकला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासह आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसंच कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे.
नाशिक, पालघर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.