नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील राजकीय घडामोडी, संघर्ष तसेच २८ जून रोजी होणारी बकरी ईद व २९ जूनला साजरी होणारी आषाढी एकादशी या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १४ ते २८ जून दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.
या आदेशान्वये कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे तसेच वापर करणे, जमा करणे व तयार करणे यासाठी मनाई करण्यात आली आहे.
तसेच शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंडे, काठया, बंदुका व शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. तसेच घातक व धारदार असा नायलॉन मांजा जवळ बाळगणे निर्मिती करणे, विक्री करणे, साठा व वापर करणे आदीसाठी मनाई असणार आहे.
कोणत्याही इसमांचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे इत्यादी मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, वादय वाजविणे, इत्यादी यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
![]()


